गुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

धुळे जिल्हा प्रतिनिधी उमाकांत अहिरराव

धुळे, दि. 26 . 12 . 2018 गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी पोलीस दलाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे आदि उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, सामान्य नागरिकांशी संबंधित असलेले मोटर सायकल आणि मोबाईल चोरी करणारे गुन्हेगार न सापडल्यास नागरिकांचा कायद्यावरील विश्वास राहणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने आपली कार्यक्षमता वाढवून असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. धुळे जिल्ह्यातील दोषारोप सिध्दीचा दर हा 35 टक्के आहे तो पुढील काळात वाढण्यासाठी फिर्यादी, पंच फितुर होणार नाहीत यासाठी पोलीस ठाणे प्रभारी व सरकारी वकील यांनी समन्वयाने कामकाज करावे. तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून धुळे जिल्ह्याची ओळख बदलण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत. महिलांवरील अत्याचारासंबंधी गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पुर्ण व्हावा त्याच बरोबर गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढावे, रस्ता सुरक्षेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रयत्न करावेत. सबळ पुराव्याअभावी गुन्हेगारांना जामीन मिळू नये यासाठी तपास करतांना भक्कम पुरावे गोळा करावेत असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. सीसीटीएनएस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश दिले.

धुळे शहरात सीसीटीव्ही प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मान्यता देण्यात यावी, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील पोलीसांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 560 घरांचा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार असून त्यानंतर 280 घरांचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येईल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला.

मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक पोलीस ठाणे निहाय गुन्हे व तपासाबाबत आढावा घेतला. पोलीस अधिक्षक श्री.पांढरे यांनी जिल्ह्यातील गुन्ह्याचा शोध आणि प्रतिबंध, दोषारोप सिध्दीचा दर वाढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, दामीनी पथकामार्फत होत असलेली कारवाई, सामाजिक एकोप्यासाठी करण्यात येणारे प्रयतन, कायदा व सुव्यवस्थेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *