लोकशाही बळकट करण्यासाठी युवापीढीने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी कुमार

Spread the love

कुडाळ येथे साजरा झाला ९ वा राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस

कुडाळ (प्रतिनिधी)
आजची युवा पिढी हि सिनेमा, क्रिकेट, संगीत मैफिली आणि मौजमजा करण्यात दंग असते. पण योग्य व्यक्ती निवडून देण्याच्या प्रक्रियेत या युवापिढीचा सहभाग दिसत नाही. हि खेदाची बाब आहे असे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या ९ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदान दिवसाच्या समारंभावेळी व्यक्त करून निवडणूक आयोगाने आता दिव्यांग तसेच ज्यांच्या पर्यंत अजून मतदार हि संकल्पना पोहचलेली नाही अशा घटकांपर्यंत जाण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे असे त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने ९ वा राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला. या राज्यस्तरीय मतदार दिवसाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सौ. नंदिनी कुमार, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नाटककार दिग्दर्शक गंगाराम गवाणकर, आदिवासी कार्यकर्ते उदय आईर, अध्यक्ष रूपाली पाटील, प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, प्रसिद्ध नेमबाज विक्रम भांगले, कालनिर्णयचे संचालक जयराज साळगावकर, सुप्रसिद्ध गायिका अक्षता सावंत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टर ओंकार ओतारी तसेच जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते. या राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सकाळी कुडाळ येथे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली कुडाळ तहसिलदार कार्यालय ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी सांगितले की, युवा शक्ती हि मोठी शक्ती असल्यामुळे त्यांना डोळ्या समोर ठेवून मतदार दिवस साजरा केला जातो. १६ वर्षापासून ते १८ वर्षा पर्यंतच्या मुलांमध्ये मतदानाबदल जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम निवडणूक आयोगामार्फत हाती घेतले जात आहेत. पण अशा परिस्थितीत युवा पिढी मात्र या प्रक्रियेपासून काहीशी लांब आहे. हि खेदाची गोष्ट आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे सगळ्यात महत्त्वाचे माध्यम आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही हि आपल्या देशात आहे. इतर देशातील नागरीकांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र आपला देश स्वातंत्र झाल्यानंतर लिंग, जात, धर्म अशा कोणत्याही बंधनात न राहता सर्वांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. आता तर दिव्यांगासाठी विशेष अशी सवलत सुध्दा आयोगाने प्रदान केली आहे. ज्या घटकांपर्यंत मतदान प्रक्रियेबाबत अजूनही जागृती नाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचे कार्यक्रमही सुरू आहेत. आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक हि प्रक्रिया सर्वांत महत्त्वाची आहे. २०१९ हे सर्वांसाठीच महत्त्वाचे वर्ष आहे. कारण या वर्षात लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणूका होणार आहे. आणि या निवडणूकिमध्ये सर्वांनी उत्स्फुर्तपणे, निर्भिडपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर व राजश्री सामंत यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. आभार प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी मानले.

विलास कुडाळकर, म मराठी, कुडाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *